Wednesday, March 31, 2010

असेही प्रेमपत्र ?

प्रिय वटवट सावित्रीस,
' रंग उमलत्या मनाचे ' घेऊन ' नातीगोती ' हा प्रपंच आपल्या हातात ' लग्नाची बेडी ' पडण्या
अगोदर ' मोरूची मावशी ' होऊ नये आणि ' ती फुलराणी ' बहारण्याआधी आपल्या प्रेमाचा सूर्यास्त होऊ नये हा एकमेव उद्देश ' ध्यानीमनी ' नसताना तू भेटलीस आणि जणू ' उघडले स्वर्गाचे द्वार ' ' कार्टी काळजांत घुसली ' हे जाणवेपर्यंत मी प्रेमाच्या महासागरात गटांगळ्या खात होतो. अखेर वाहतो ' ही दुर्वांची जुडी ' म्हणत माझे हृदय तुझ्या चरणी अर्पण केले. ' देखणी बायको दुसऱ्याची ' हा घरोघरी पसरलेला गैरसमज. जसे ' व्यक्ती आणि वल्ली ' तसे पुरुष आणि प्रवृत्ती पण ' तो मी नव्हेच ' हे तुला शपथपूर्वक सांगू शकतो कारण मी काही ' सखाराम बाईंडर ' नव्हे किंवा ' बेईमान ' ही नव्हे. ' सुंदर मी होणार ' असे आईला सांगितल्यापासून आमच्या प्रिय आईस वेगळाच संशय येऊ लागला आहे.येडा बनके पेडा खाव असे मनाशी ठरवत मी तो विषय टाळला. शेवटी लग्न 'ज्याचा त्याचा प्रश्न ' आणि निवडच करायची तर जे सावित्रीमध्ये आहे ते ' कुसुम मनोहर लेले ' मध्ये नाही आणि ' सविता दामोदर परांजपे ' मध्ये तर नाहीच नाही. ' सासूबाईच असंच असतं ' हे म्हणण्याआधी ' आई रिटायर्ड होतेय ' ही बातमी दिलेली बरी नाहीतर ' चारचौघी ' सारखी तुझी धावपळ नको नाहीतर आपली ' ऑल दि बेस्ट ' जोडी तुझ्या तीर्थरूपांना ' जावई माझा भला ' असे म्हणण्याची वेळ आणतो की नाही ते बघच. ' तू फक्त हो म्हण ' आणि हा सुखद शेवट आपल्याच हाती आहे. मग ' कमाल कसली धमालच आहे ' आणि त्यासाठी तुला यावच लागेल.

Monday, March 29, 2010

एकांत

एकांत - कोणाला हवाहवासा तर कोणाला अजिबात नको असणारा.

खरं तर एकांताचच नाव एकटेपणा ;पण दोन्ही शब्दांच्या अनिभूतीत किती फरक आहे. एकांत म्हटला की काही वेगळेच भाव मनात तरळतात . परकेपणाचा पडदा दूर सारून नव्या ओळखीच्या उबदार दुलईत दोन जीवांनी एकमेकांना गुरूफुटून घेतलेले पाहून सुखावणारा तो एकांत!
....... आणि एकटेपणा म्हणजे केवळ एकालाच जीव - सार्या माणसांपासून दूर ........एकाकी.
खरं पाहता खूप माणसं आसपास असली तरी प्रत्येक माणूस एकटाच असतो. काही वेळा कोशात असल्याप्रमाणे एकटा. मला स्वतःला असं एकटं रहायला बरं वाटतं - नेहमी नाही हे, पण तरी बऱ्याच वेळा. काही क्षण से असतात की ते आपले स्वतःचे असतात. किंबहुना त्यांच्या आठवणींचा सुखद्पणा केवळ आपलाच असो. ते क्षण ज्याच्याशी जोडलेले असतात त्याला कदाचित आपल्या ह्या मनस्थितीचा पत्ताही नसतो; पण हा एकाकीपणा, हे हरवलेपण कसं असतं माहित आहे?
......... हिरव्यागार गवतात एखादंच फूल डोलत असतं, मुग्धपणे स्वतःशीच हसत असतं, वाऱ्याच्या झुळकीबरोबर नवीनच आठवण आल्यासारखं लाजत असतं, ते फूल स्वतःतच मग्न असलं तरी त्याला ते आसपासचं गवत हवं असतं, आपलं वेगळेपण, एकटेपणा टिकवण्यासाठी ते गवत नाहीसे झाले तर त्या फुलाला जगणं असह्य होईल.
मला आवडतं त्या फुलासारखं रहायला. सर्वांच्यात असूनही , सर्वांच्यात मिसळूनही पुन्हा त्यांच्या भावनांपासून अलिप्त.आपलीच सुख-दु:ख कवटाळत रहायला. हे वागणे फार चांगले आहे असे ही नाही;पण तरीही त्या जगण्यात ही एक वेगळीच मजा आहे. आपल्याच कल्पना सागरात भावनांच्या लाटांवर हलकेच झुलत रहायला - त्यातही एक रंगत आहे. गोडी आहे!

( माझा हा पहिलाच लेख आहे त्यामुळे व्याकरणात काही चूक असल्यास माफ करावे, ही विनंती.)