Monday, March 29, 2010

एकांत

एकांत - कोणाला हवाहवासा तर कोणाला अजिबात नको असणारा.

खरं तर एकांताचच नाव एकटेपणा ;पण दोन्ही शब्दांच्या अनिभूतीत किती फरक आहे. एकांत म्हटला की काही वेगळेच भाव मनात तरळतात . परकेपणाचा पडदा दूर सारून नव्या ओळखीच्या उबदार दुलईत दोन जीवांनी एकमेकांना गुरूफुटून घेतलेले पाहून सुखावणारा तो एकांत!
....... आणि एकटेपणा म्हणजे केवळ एकालाच जीव - सार्या माणसांपासून दूर ........एकाकी.
खरं पाहता खूप माणसं आसपास असली तरी प्रत्येक माणूस एकटाच असतो. काही वेळा कोशात असल्याप्रमाणे एकटा. मला स्वतःला असं एकटं रहायला बरं वाटतं - नेहमी नाही हे, पण तरी बऱ्याच वेळा. काही क्षण से असतात की ते आपले स्वतःचे असतात. किंबहुना त्यांच्या आठवणींचा सुखद्पणा केवळ आपलाच असो. ते क्षण ज्याच्याशी जोडलेले असतात त्याला कदाचित आपल्या ह्या मनस्थितीचा पत्ताही नसतो; पण हा एकाकीपणा, हे हरवलेपण कसं असतं माहित आहे?
......... हिरव्यागार गवतात एखादंच फूल डोलत असतं, मुग्धपणे स्वतःशीच हसत असतं, वाऱ्याच्या झुळकीबरोबर नवीनच आठवण आल्यासारखं लाजत असतं, ते फूल स्वतःतच मग्न असलं तरी त्याला ते आसपासचं गवत हवं असतं, आपलं वेगळेपण, एकटेपणा टिकवण्यासाठी ते गवत नाहीसे झाले तर त्या फुलाला जगणं असह्य होईल.
मला आवडतं त्या फुलासारखं रहायला. सर्वांच्यात असूनही , सर्वांच्यात मिसळूनही पुन्हा त्यांच्या भावनांपासून अलिप्त.आपलीच सुख-दु:ख कवटाळत रहायला. हे वागणे फार चांगले आहे असे ही नाही;पण तरीही त्या जगण्यात ही एक वेगळीच मजा आहे. आपल्याच कल्पना सागरात भावनांच्या लाटांवर हलकेच झुलत रहायला - त्यातही एक रंगत आहे. गोडी आहे!

( माझा हा पहिलाच लेख आहे त्यामुळे व्याकरणात काही चूक असल्यास माफ करावे, ही विनंती.)

1 comment:

  1. "हुप्पा हुय्या" नावाचा अर्थ काय गुरु !!!

    ReplyDelete